बिबवेवाडी कोठे आहे ते माहिती आहे का ?
उत्तर:- आमचे गांव हे शहरात
आहे. पुन्यामधे स्वारगेट जवळ ३ किमी वर आमचे गाव आहे.

रविवार, १७ ऑक्टोबर, २०१०


रंजल्या गांजलेल्यांची आई - पद्मावती


पुणे- सातारा रस्त्यावरील पद्मावती देवीची स्वयंभू मूर्ती म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. नवसाला पावणारी देवी, भक्तांच्या हाकेला धावून येणारी माता, रंजल्या गांजलेल्यांच्या झोळीत कृपादृष्टीचे दान टाकणारी आई म्हणून या देवीला ओळखले जाते. नवरात्रोत्सवात पहाटे चारपासूनच भाविक मातेची खणा-नारळाने ओटी भरण्यासाठी आणि देवीच्या चरणी मस्तक ठेवण्यासाठी येत असतात.
पद्मावती देवी म्हणजे बिबवेवाडीचे ग्रामदैवत. या देवीच्या नावावरूनच येथील परिसराला पद्मावतीनगर म्हणून ओळखले जाते. सातारा रस्त्यावरून सहकारनगर पोलिस स्टेशनकडे जाताना नाल्याच्या काठी उजव्या हाताला हे मंदिर आहे. सुमारे तीस-पस्तीस गुंठ्याचा मंदिराचा परिसर आहे. भरवस्तीत असूनही आपण शहरापासून दूरच्या परिसरात आल्याचा अनुभव येथे आल्यावर येतो. मंदिराच्या परिसरात दोन वडाची व दोन पिंपळाची विस्तीर्ण झाडे असून, या चार झाडांनी तब्बल वीस गुंठ्याचा परिसर व्यापला आहे.
त्यामुळे दिवसाही येथे दाट सावली असते. झाडाची दाट सावली व मंदिराच्या प्रसन्न वातावरणामुळे एखाद्याला कितीही थकवा आला, तरी क्षणात नाहीसा होतो. काही नागरिक येथील नैसर्गिक शांतता अनुभवायला व पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला खास येत असतात.
पद्मावती मंदिर ऐंशी वर्षापेक्षाही जुने मंदिर आहे. या मंदिराची उभारणी नक्की कधी झाली, हे सांगता येत नसले, तरी 1938 पूर्वी येथे लहान मंदिर उभारले असल्याचे सांगितले जाते.
पन्नाशीच्या दशकात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तर पंधरा वर्षांपूर्वी मंदिराच्या समोरील सभामंडप बांधण्यात आला. या मूर्तीविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी या परिसरात बिबवे कुटुंबीयांची शेतजमीन होती. ही शेती कसणारे धर्माजी बिबवे यांना देवीने स्वप्नात दृष्टान्त दिला व शेतामध्ये मूर्ती असल्याचे सांगितले. धर्माजीबाबांना ही मूर्ती तेथे सापडल्यावर त्यांनी तेथे छोटे देऊळ बांधले.
भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून पद्मावती देवीची प्रसिद्धी सगळीकडे पसरली. त्यानंतर बिबवेवाडी ग्रामस्थ ग्रामदेवता म्हणून तिचा उत्सव साजरा करू लागले. आजतागायत ही प्रथा सुरू आहे. हनुमान जयंतीच्या पाचव्या दिवशी बिबवेवाडी ग्रामस्थ देवीची  जत्रा करतात. मंदिरापासून गावापर्यंत पालखीतून देवीची मिरवणूक काढली जाते, तर पौष महिन्यात संपूर्ण महिनाभर देवीची यात्रा भरविली जाते. याशिवाय स्थानिक नागरिक अक्षयतृतीयेला यात्रा भरवितात. धर्माजीबाबांची तिसरी पिढी देवीची सेवा करत असून, आजही ते मंदिराच्या परिसरात वास्तव्यास आहेत.
नवरात्रात शहरातून तसेच बाहेरगावाहून भाविक दर्शनाला येत असतात. अष्टमीला होम, दसऱ्याला सीमोल्लंघनाचा पालखी सोहळा व कोजागरी पौर्णिमेला दूध वाटपाचा कार्यक्रम केला जातो. नवरात्र काळात लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी व मंदिराच्या कुंडात स्नान करण्यासाठी येत असतात. कुंडातील पाण्याने स्नान केल्याने त्वचा रोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

-लखन बिबवे 
9921848003

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा